Eknath Shinde : मुख्यंत्री एकनाथ शिंदे हे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी सभा घेणार आहेत.
दुपारी दोन वाजताची संगमनेरची सभा उरकून ते सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. एका मतदारसंघात एकाच वेळी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याने महायुतीचे कार्यकर्ते सभेच्या जोरदार तयारीला लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिर्डी मतदारसंघात येणार असल्याने मतदारसंघाचे वातावरण ढवळून निघणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक प्रचारात सक्रीय झाल्याने ही सभा जंगी होणार असल्याची शक्यता आहे. या सभेपूर्वी युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मोटारसायकल रॅलीने स्वागत केले जाणार आहे.
संगनेरच्या सभेची वेळ दुपारी दोनची असल्याने उन्हामुळे मैदानाऐवजी मालपाणी लॉन्सला घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मालपाणी लॉन्स येथे होणारी सभा यशस्वी करण्याची जबाबदारी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शहर प्रमुख विनोद सुर्यवंशी यांच्यावर आहे.
त्याचबरोबर त्यांच्या जोडीला भाजपचे तालुकाप्रमुख सिताराम भांगरे, वैभव लांडगे, संगमनेर शहरप्रमुख श्रीराम गणपुले, अमोल खताळ, सुजीत क्षिरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार आहेत.
संगमनेर व श्रीरामपूरमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार नसतानाही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी मोठे कष्ट करताना दिसत आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता दोन्ही ठिकाणच्या सभा यशस्वी होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांनी व्यक्त केला आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन खा. लोखंडे यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे मंत्री विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह मुरकुटेंचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
मंत्री विखे यांच्यासह आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे हे सर्व प्रचारात सक्रीय झाल्याने रंगत वाढली आहे.