Ahmednagar News : दिवसेंदिवस अपघातांच्या घटनात वाढ होत आहे. रोज जिल्ह्यात अपघात झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र या अपघातात अनेक निरपराध नागरिक आपला जीव गमावतात. नुकतेच मोटारसायकलवर आई आणि मुलगा जात होते.
दरम्यान समोर गतीरोधक असल्याने त्या मुलाने मोटारसायकलचा वेग कमी केला. मात्र पाठीमागून वेगात आलेल्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली.
या अपघातात आईचा मृत्यू झाला तर तिचा तरुण मुलगा जखमी झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. प्रतीककुमार कवडे असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर पुष्पा कवडे असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी प्रतीककुमार सुनील कवडे (वय २७, शनीमंदिर मळा, ओझर, ता. जुन्नर, जि.पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मधुकर महादेव वारे (वय ३८, रा. हिरडपुरी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) याचेविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतीककुमार कवडे व त्याची आई पुष्पा कवडे हे दोघे मायलेक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून (क्र. एम.एच.१४, ए.टी.७५६) आळेफाट्याच्या दिशेने येत होते. ते डोंगरे फर्निचर समोर असलेल्या गतीरोधकाजवळ आले असता प्रतीककुमारने दुचाकीचा वेग कमी केला.
त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या (क्र. एन.एल.०१, ए.एफ.९०६६) चालक मधुकर वारे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात प्रतीककुमारची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस नाईक शिंगाडे करीत आहेत.
दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाचा वेग नियंत्रित राहावा, हा गतीरोधक उभारण्याचा उद्देश असला तरी सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीरोधक महामार्गावर वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
या बायपासवर सर्वत्र गतीरोधक करताना रस्त्याच्या कोणत्याही निकषाचे पालन होत नसल्याचे वारंवार गतिरोधकावर होणाऱ्या अपघाताने समोर आले आहे.