Ahmednagar News : राज्यात सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटना घडत असतानाच आता दुसरीकडे अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढत आहेत.
यात नगर जिल्ह्यात देखील अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडत असल्याच्या समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मुलीची तसेच महिलांची देखील सुरक्षा धोक्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून गेल्या २ दिवसांत नगर शहरासह नगर तालुका, कर्जत, शेवगाव येथून ४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत.
त्यांना फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी शुक्रवारी (दि.३०) दिवसभरात ४ पोलिस ठाण्यात ४ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नगर शहर परिसरात पाईपलाईन रोड भागात राहणारी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (दि.३०) सकाळी ११ च्या सुमारास घरातून पेपर देण्यासाठी कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडली. ती सायंकाळ पर्यंत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिची काहीही माहिती मिळाली नाही.
त्यामुळे तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीला पळवून नेण्याची दुसरी घटना नगर तालुक्यातील हिवरे झरे या गावात घडली आहे . तेथून एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि.२९) रात्री १०.३० ते शुक्रवारी (दि.३०) पहाटे ५ या कालावधीत फूस लावून पळवून नेले आहे.
याबाबत तिच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपहरणाची तिसरी घटना शेवगाव तालुक्यातील मुरमी गावात घडली. या गावातून एका १६ वर्षीय मुलीला कोणीतरी कशाचे तरी अमिष दाखवत गुरुवारी (दि.२९) रात्री १० ते शुक्रवारी (दि.३०) पहाटे १.३० या कालावधीत फूस लावून पळवून नेले.
याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर अपहरणाची चौथी घटना कर्जत तालुक्यातील खेड या गावात गुरुवारी (दि.२९) सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. येथून एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसात चार मुलींना पळवून नेल्याच्या घटनांमुळे पालक वर्गात चांगलीच घबराट पसरली आहे.