Mla Lahu Kanade : जलजीवन मिशनच्या चुकीच्या कामाची पोलखोल ! कोऱ्या फॉर्मवर सरपंचाच्या सह्य…

Ahmednagarlive24 office
Published:

आमदार लहू कानडे यांच्या जनसंवाद यात्रेत जलजीवन मिशन योजनेच्या चुकीच्या कामाची पोलखोल झाली आहे. यावेळी तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेतल्याचे आढळून आले.

त्यामुळे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. कानडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. निवडणूकीची चार महिने बाकी असताना आ. लहू कानडे यांनी प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या काळात झालेली कामे व पुढे करायचे अत्यंत महत्त्वाची कामे यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे.

सर्व जनतेला एकत्र करून त्या गावात मंजूर केलेली कामे वाचवून दाखवत या कामाच्या सद्यस्थितीची माहिती या दौऱ्यात घेतली जात आहे. या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आ. कानडे तालुक्यातील मातुलठाण येथे गेले असता, त्यांना जलजीवन मिशनच्या कामाबाबत भलताच प्रकार आढळून आला.

कोणत्याही घरामध्ये अद्याप कनेक्शन दिलेले नसताना व जलजीवन योजनेचे पाणीही ग्रामस्थांना मिळत नसताना उर्वरित बिल काढून घेण्यासाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची टीम चुकीचे काम करत असल्याचे आढळून आले.

यावेळी टाटा कन्सल्टन्सीचे दोन अधिकारी, पंचायत समितीचे या योजनेचे अभियंता आणि ठेकेदाराचे सुपरवायझर अशा चौघा जणांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये ग्रामपंचायत सदस्य किंवा पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य किंवा कोणाही ग्रामस्थांना सहभागी करून न घेता तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेतल्याचे आढळून आले.

हे करीत असताना तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदर दप्तर हस्तगत केले आणि संबंधितांना आ. कानडे आल्यानंतर त्यांच्यासमोर आणले. जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण नसताना या पद्धतीने खोटे-खोटे इन्स्पेक्शन करून उर्वरित रकमेची बिले काढून घेण्याचा हा प्रकार लक्षात आल्याने आ. कानडे यांनी संबंधित टाटा कन्सल्टन्सीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

कोऱ्या कागदावर सह्या घेणे हा गुन्हा आहे, तुम्ही फसवणूक करत आहात, यामुळे ग्रामस्थांना कधीच पिण्याचे पाणी मिळणार नाही, हा अपराध असल्याने मला तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे, असे सांगत त्यांन खडसावले.

संपूर्ण गावकऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांनी सर्वांची माफी मागितली व पुन्हा असे करणार नाही असे सांगितले, तरी देखील सदरच प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांन कळविण्यात यावा,

तसेच सदरचे दप्तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशा सूचना आ. कानडे यांन येथील सदस्य व ग्रामसेवकांना केल्या आ. कानडे यांना याबाबतचे उत्तर देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe