Ahmednagar News : धारदार हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून करण्याची घटना खडकी परिसरात शनिवारी रात्री घडली होती. ही हत्या मुलानेच केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
आईची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ज्ञानेश्वर शंकर पवार (वय-३५, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे आरोपीचे नाव आहे असून गुंफाबाई शंकर पवार, वय- ५५ (मूळ रा. मुठेवाडगाव, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांचा मुलानेच धारदार हत्याराने गळा चिरुन खून केला होता.
या प्रकरणी योगेश शंकर पवार (वय-२९, रा. देहू रस्ता) यांनी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावरुन ज्ञानेश्वर पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी ज्ञानेश्वर पवार एका फॅक्टरीत टेलिकम्युनिकेशन विभागात तंत्रज्ञ आहे. त्याचा सुमारे चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे.
तो सध्या घरी एकटाच रहात होता. त्याने मुठे वाडगाव गावात रहात असलेल्या आईला खडकी येथे घरी बोलावून घेतले. कौटुंबिक वादातून शनिवारी रात्री त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरुन खून केला.
त्यानंतर तो पसार झाला होता. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. वरिष्ठ निरीक्षक गिरीध दिघावकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ,
पो. कर्मचारी संदेश निकाळजे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला रविवारी रात्री शिर्डी परिसरातून अटक केली होती.
त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.