Ahmednagar News : मोटारसायकली चोरणारी टोळी पकडली ! १८ मोटारसायकली जप्त, मालेगावच्या मामाच्या मदतीने अहमदनगरमधील भाचा करायचा विक्री

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरून त्यांची विक्री करणारी चोटी जेरबंद केली असून त्यांच्याकडून तब्बल १६ लाख रूपयांच्या १८ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

विशेष म्हणजे मोटारसायकल चोरी करणारे सर्व चोर हे श्रीरामपुरातीलच आहेत आणि यातील एक भाचा हा मालेगाव येथील आपल्या मामाच्या मदतीने या मोटारसायकली विकायचा,

हेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर परिसरात सतत मोटारसायकल चोऱ्या होत असताना पोलिसांनी तपास लावून मोटारसायकल चोर पकडल्याने पोलिसांना धन्यवाद देण्यात येत आहे.

श्रीरामपूर शहर आणि परिसरात तसेच नगर जिल्हयात ठिकठिकाणांहून मोटारसायकल चोरीच्या घटना नेहमी घडत असल्याचे पुढे येते.

खंडाळा येथील शेतकरी अमोल बोरकर यांची १२ जानेवारीला मोटारसायकल चोरीला गेली होती. त्याचा तपास शहर पोलीस करीत होते.

सदर तपास करताना ऋषिकेश जाधव, (रा. सूतगिरणी फाटा) याचे संशयित म्हणून नाव पुढे आले. मात्र, हा आरोपी सतत ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांना लवकर तो हाती लागेना. पोलिसांनी सापळा लावून आरोपी ऋषिकेश कैलास जाधव याचा पाठलाग करून त्याला पकडले.

तेव्हा त्याने दिलीप मोहन आढाव, (वय-५२, रा. आगाशेनगर, दत्तनगर, श्रीरामपूर), किरण संतोष मोरे, (वय १९, रा. सूतगिरणी, रमानगर, श्रीरामपूर) यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले.

त्यांनतर पोलिसांनी अधिक विश्वासात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता श्रीरामपूरसह नगर शहर व इतर ठिकाणच्या मोटारसायकली आणि मोपेड चोरल्याची त्यांनी कबूली दिली आणि या चोरीत आपल्याबरोबर दानिश महंमद सय्यद, (रा. इदगाह मैदान, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर), (गौरव बागूल, रा.रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर), संदीप सुडगे, (रा. रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर) अशांनी मिळून या चोऱ्या केल्याची कबूली दिली.

यातील आरोपी दानिश हा पोलिसांना सापडत नव्हता. तो मालेगावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने शोध घेत त्याला मालेगाव येथे पकडले.

तेव्हा त्याने सांगितले की सदर चोरीच्या मोटारसायकली आपण माझे मामा रियाज हुसनउद्दीन शेख, रा. छोटा कब्रस्थानजवळ,

आझादनगर, मालेगाव यांच्यामार्फत विक्री करण्यासाठी मालेगावला आल्याची कबूली दिली. पोलिसांनी मामाच्या राहत्या घरून ११

मोटारसायकली जप्त केल्या. तसेच त्यानंतर वेगवेगळ्या गुन्हयातील मोटारसायकली आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जप्त केल्या.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या तपासकामी मोलाची कामगिरी बजावली आहे.

पोलीस निरीक्षकाचीही मोटारसायकल सोडली नाही
सर्वसामान्य लोकांच्या, त्यात व्यापारी, शिक्षक, दुकानदार, व्यावसायीक यांच्या मोटारसायकली सर्रास चोरीला जातात.

मात्र, थेट एका पोलीस निरीक्षकाचीही मोटारसायकल या टोळीने चोरली होती. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीमध्ये ही मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe