निसर्ग कोपला ! भूस्खलनमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी, चार गावे गाडली गेली

Ahmednagarlive24 office
Published:
bhuskhalan

नयनरम्य हिरवाईने नटलेल्या केरळच्या वायनाड जिल्ह्यावर मंगळवारी निसर्ग अक्षरशः कोपला. जिल्ह्यातील मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही चार गावे भूस्खलनात पूर्णपणे गाडली गेली.

या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ९३ लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक दगड-माती-चिखलाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे बळींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत केंद्राकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मंगळवारी पहाटे २ ते ६ च्या दरम्यान एकामागे एक भूस्खलनाच्या तीन घटना घडल्या. दिवस उजाडल्यानंतर निसर्गाच्या या प्रकोपाची तीव्रता निदर्शनास आली. डोंगरावरून आलेल्या दगड-मातीच्या लोंढ्याखाली गावेच्या गावे गडप झाली. घर, पूल, रस्ते, गाड्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले, जे काही वाचले

ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. झोपेत असतानाच काळाने घाला घातल्याने लोकांना सावध होण्याचीही संधी मिळाली नाही. अनेक वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. मदत व बचाव कार्यासाठी एसडीआरएफ एनडीआरएफच्या पथकांसह लष्कर आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात येत आहे.

युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात येत असून, मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

आतापर्यंत ९३ लोकांचे मृतदेह हाती लागले असून, बचाव कर्मचाऱ्यांना नदी, चिखलातून लोकांचे अवयव सापडत असल्याने बळींचा आकडा तासागणिक वाढत आहे. दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळाची भयावहता दाखवणारे एक दृश्च सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये चिखलाने माखलेला एक व्यक्ती पाण्याच्या वेगवान प्रवाहात आपला जीव वाचवण्यासाठी एका मोठ्या शिळेला चिकटून उभा राहण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची माहिती घेत मदतीचे आश्वासन दिले आहे.

पीडितांना तसेच केरळ राज्यासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बुधवारी वायनाडचा दौरा करणार आहेत. राहुल हे वायनाडचे खासदार होते, तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रियंका यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe