सर्दी,ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

Published on -

श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे आठवडाभरापासून सर्दी, ताप तसेच खोकल्याच्या रुग्णात वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत असल्याचे दैनंदिन चित्र दिसून येत आहे.

पढेगाव परिसरात प्रत्येक घरात सर्दी, खोकला किंवा तापेचा रुग्ण आढळून येत आहे. त्यातच गावात एका मुलीस डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याने नागरिक आणखीच भयभीत झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावासह परिसरात जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे गावासह परिसरात गवत व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गवतामध्ये तसेच पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डेंगू, मलेरिया यासारखे आजारांना निमंत्रण मिळत आहे. यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप खोकल्यासारखे आजाराचे रुग्ण वाढले आहे. सर्दी, खोकला, ताप तसेच डोकेदुखी यामुळे नागरिक रक्त, लघवी तपासून मलेरिया किंवा साथीच्या आजाराची लागण तर झाली नाही ना याची खात्री करून घेत आहेत.

सध्या नवरात्रोत्सव असल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच खोकला, सर्दी यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात अचानकपणे बदल होवून त्याचा परिणाम मानवी शरीरावर झाल्यानेच सर्दी, खोकला व तापेचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच जनजागृतीची मोहीम हाती घेऊन डास निर्मूलनासंबंधी नागरिकांना जागृत करावे. तसेच गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर औषध फवारणी होणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News