रमजानमध्ये मुकुंदनगर भागात मुलभूत सुविधांना सवलत देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या मुकुंदनगर भागामध्ये रमजान निमित्त मुलभूत जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देण्याची

तसेच पहाटे व संध्याकाळी दोन वेळच्या आजानला मुभा मिळण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी निवेदन पाठवून केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्य आदेशानुसार मुकुंदनगर परिसर हॉट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. अनेक दिवसापासून या भागातील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद होती. हॉट स्पॉटचे निर्बंध गुरुवार दि.23 एप्रिलच्या मध्यरात्री पासून हटणार आहे.

तर लगेचच दुसर्‍या दिवशी रमजानची चाँद रात असून, शनिवार दि.25 एप्रिल पासून उपवासाला प्रारंभ होणार आहे. मुकुंदनगर भागातीला नागरिकांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असून, किराणा दुकान, दवाखाने, मेडिकल, पिठाची गिरणी अशासाठी सवलत द्यावी.

तर रमजानमध्ये उपवास करण्यासाठी व सोडण्यासाठी अनुक्रमे पहाटे (फजर) व संध्याकाळी (मगरीब) ची अजानमुळे वेळ निश्‍चित समजते. यासाठी प्रशासनाने मशीदीमध्ये फक्त मौलवींना दोन वेळेस आजान देण्याची मुभा मिळण्याची मागणी केली आहे.

तसेच संपुर्ण मुस्लिम समाज बांधव रमजान मध्ये आपली उपासना घरीच करणार असून, शासनाने सुचवलेल्या नियम व निर्बंधाचे सर्व समाजबांधव पाळण करणार सलल्याचे अजीम राजे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे