नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी दि.१ एप्रिल पासून मतदार संघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता शुक्रवारी (दि.१९) नगरमध्ये होत असून त्यानिमित्त दुपारी सभा ४ वाजता ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे.
या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा दि. १ एप्रिल पासून मोहटा देवी गडावरून सुरु झाली. १९ दिवस चाललेली ही यात्रा पाथर्डी, शेवगाव राहुरी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमधून नगर शहरात आलेली आहे.
या दरम्यान निलेश लंके हे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमवेतच जेथे जागा उपलब्ध होईल तेथे मुक्काम करत होते. या यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे. यात्रेदरम्यान सर्वसामान्यांचे प्रश्न त्या त्या भागातील अडीअडचणी लंके यांनी समजून घेत जनतेशी आपुलकीने संवाद साधला आहे.
बुधवार पासून ही यात्रा नगर शहरात सुरु आहे. शहरातील विविध प्रभागात ही यात्रा जात असून ठिकठिकाणी चौक सभा घेतल्या जात आहेत. या यात्रेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
तसेच शहरातील नागरिकांनीही या यात्रेचे जोरदार स्वागत केले आहे. शुक्रवारी होणाऱ्या सांगता सभेसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.