नगर अर्बन बँक बुडवणाऱ्या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही…

Published on -

Ahmednagar News : रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी येत्या बुधवारी (दि.१८) पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

लालटाकी येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या जिल्ह्यातील ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावाने शिमगा करण्यात आला. या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धारही यावेळी करण्यात आला.

११३ वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना ४ ऑक्टोबर रोजी रिझर्व बँकेने रद्द केला आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार व कामकाज बंद झाले आहे. बँकेच्या पाच लाखाच्या आतील ठेवीदारांना दोन टप्प्यात त्यांचे पैसे मिळाले असले तरी यापैकी राहिलेल्या ठेवीदारांचे तिसऱ्या टप्प्याचे ४२ कोटी मिळालेले नाहीत.

याशिवाय पाच लाखांवरील १६०० वर ठेवीदारांचे सुमारे ३०० कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत. त्यामुळे हे पैसे मिळण्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी सायंकाळी ठेवीदारांची बैठक झाली.

यावेळी येत्या बुधवारी नगर अर्बन बँकेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाभरातून अनेकजण आले होते.

यावेळी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा व राजेंद्र गांधी म्हणाले की, फक्त ठेवीदारांनी आम्हाला साथ देण्याचे आवाहन केले. तसेच बँकेचे ठेवीदार डी.एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा, अॅड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, सीए राजेंद्र काळे, आर.डी.मंत्री, एस. झेड. देशमुख, प्रकाश गांधी, महेश देवरे, संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, सुरेश क्षिरसागर आदींसह जिल्हाभरातून आलेले ठेविदार उपस्थित होते.

जरांगेचा आदर्श घ्या

यावेळी बोलताना राजेंद्र चोपडा यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. तो एकटा माणूस पंधरा दिवस उपोषणाला बसला तर त्यांनी राज्य हलवून टाकले आहे.

त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आपल्यालाही मोर्चे, उपोषण व अन्य आंदोलनात्मक मार्ग स्वीकारायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनास टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe