कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ! ओबीसी व मराठा समाजाने तणाव निर्माण करू नये, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आवाहन…

Published on -

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आंदोलने करत आहे. तर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी बांधव आक्रमक झाला आहे.

त्यामुळे यातून तणाव निर्माण होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. आता यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका बदललेली नाही.

त्याचबरोबर मराठा समाजानेही सरकारच्या निर्णयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याची हमी दिली आहे. त्यामुळे ओबीसी बांधव व मनोज जरांगे पाटील या दोघांनीही राज्यात ताण-तणाव निर्माण करण्यापेक्षा शांतता राखावी, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर सांस्कृतिक महोत्सव व महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळाची पाहणी करताना पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे यांनी हे वक्तव्य केले.

प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, पण..
मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतरी नंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्याचा कोणत्या हद्दीपर्यंत उपयोग करावा याची लक्ष्मणरेखा आखली गेली पाहिजे.

त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सामान्य माणूस भरडत चालला आहे, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊतांवरही घणाघात
राहुरी येथील वकील दांपत्याच्या खुनाच्या घटनेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री विखे यांच्यावर टीका करताना, विखे पाटील जिल्ह्यात काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले, मी काय करतो हे नगर जिल्ह्यातील जनता पाहते आहे.

परंतु संजय राऊत यांच्या बेताल वक्ताव्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले. आता उरल्या सुरलेल्यांचा निकाल लावायचं त्यांनी ठरवल्याचे दिसते आहे, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe