आता नगरमधील ‘त्या’ मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेत पावणे सहा कोटींचा अपहार ; पोलिसांनी घेतला ‘तो’ निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सहकाराचे उगमस्थान असलेल्या नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस अनेक पतसंस्था,मल्टिस्टेटमध्ये मोठ मोठे घोटाळे होत असून, या संस्था दिवाळखोरीत निघत आहेत. मात्र यात सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई अडकून पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातच सहकाराला घरघर लागली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा असलेल्या नगरच्या अर्बन बँक देखील दिवाळखोरीत आहेत. या बँकेत १०० कोटींपेक्षा अधिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील देखील एक पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपअध्यक्ष व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापाठोपाठ नगरमधील ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेत देखील जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून ११२ ठेवीदारांचे पाच कोटी ७८ लाख ६५ हजार ९० रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपहार प्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

या गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार मुंबई येथील कंपनीला फॉरेन्सिक ऑडीट करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. आणखी काही ठेवीदारांचे पैसे अडकले असण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक ऑडीट केल्यानंतर अपहार रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेअरमन, व्हा. चेअरमन , संचालक व सीईओ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुजाता नेवसे यांनी १ डिसेंबर २०२२ रोजी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड, पाईपलाईन रस्ता शाखेत दोन लाख रुपये मुदतठेव १४.४० टक्के व्याजदराने ठेवले.

तसेच १९ ऑगस्ट २०२३ रोजी आणखी एक लाख ७५ हजार रूपये मुदतठेव ठेवली. दरम्यान फिर्यादी नेवसे या ३ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या बालिकाश्रम शाखेत गेल्या व चेअरमन यांना भेटून दोन लाख रुपये मुदतठेवीची मागणी केली. सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, लोनचे पैसे जमा झाले की तुम्हाला बोलावून घेऊ व रक्कम परत देऊ असे सांगितले. त्यानंतरही नेवसे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत जाऊन पैशाची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

दरम्यान, ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्था बंद झाली असल्याचे नेवसे यांना १५ डिसेंबर २०२३ रोजी समजले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe