विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयाच्या मुक्त कृषि शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयामध्ये बी. एस्सी (कृषि) पदवीचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरीक्त महाविद्यालयात कृषि निविष्टा विक्रेत्याकरीता कृषि विस्तार सेवा पदविका हा एक वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविला जातो.
तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विविध कृषि शिक्षण अभ्यासक्रम चालविले जातात. सदरील अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात तसेच कृषि विद्यापीठात नोकरीच्या संधी मिळत आहेत तर काही विद्यार्थी उद्योजक बनत आहेत म्हणून या अभ्यासकमास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी नुकतेच विद्यापीठाच्या तीन सदस्सीय समितीद्वारे केंद्राचे मुल्यांकन केले होते. सदर समितीने महाविद्यालयात असणार्या भौतीक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक असलेली जमिन, शेडनेट, कृषि शिक्षण केंद्र व्यवस्थापन, मॅन्युअल, प्रशासकीय बाबी, वित्तीय बाबी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शैक्षणिक बाबी यांची तपासणी करून महाविद्यालयाच्या कृषि शिक्षण केंद्रास ’अ’ दर्जा दिलेला आहे.
प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत, समन्वयक डॉ.एच.एल.शिरसाठ, शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे या यशासाठी विशेष योगदान लाभलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले हे एक महाराष्ट्रातील नामांकीत महाविद्यालय म्हणून नावारूपास आले आहे. या महाविद्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातून कृषिचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात.
आर्थिक उत्पन्न कमी असणार्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या मार्फत ‘शिका व कमवा’ ही योजना राबविली जाते. महाविद्यालयाच्या कृषि शिक्षण केंद्रास ’अ’ दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी अभिनंदन केले. सेकेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या.