Ahmednagar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिला शोभा देणारे नाही. सदर पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेंचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री पदावर राहीलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभा देत नाहीत. परंतु सत्तेसाठी विचार गमावलेल्यांच्या तोंडी आशीच बेताल वक्तव्य येणार त्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही अशी टिका विखे पाटील यांनी केली.

नुकतेच शरद पवारांनी म्हटले होते की, मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते, मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडले आहे. कर्नाटकात घडले.
संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही.
मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असे मोदींना वाटले नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती.
तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मोदी आणि शहांनाही आव्हान देत डिवचले आहे. रंगशारदा येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र फडणवीसांनी रचले होते.
आपण शांत बसलो, पण आता शांत बसणार नाही. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फडणवीसांना ‘आता एक तर तू राहशील किंवा मी’ अशा शब्दांत अत्यंत निर्वाणीचा इशारा दिला.
याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात पण भावनेच्या भरात आपण काय बोलतो बाचे भानही उध्दव ठाकरे यांना राहू नये याचे आश्चर्य वाटते. राज्यात मणिपूरचा संदर्भ देवून जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि आता उध्दव ठाकरे यांची भाषा राज्यात दंगली घडविण्यासाठी आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील सर्व जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आता राज्यात महायुतीला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता महाविकास आघाडीला यश मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच आशी वक्तव्य पुढे येवू लागली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुध्दा आघाडीच्या तीनही पक्षाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही. काल उध्दव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवून मोकळे झाले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय केले हे एकदा तरी सांगावे असे थेट आव्हान देवून नामांतराच्या संदर्भात झालेली चूक जशी पवारांनी मान्य केली तशीच चूक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मान्य करावी आशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली.