पारनेर : साडेसहा कोटीच्या रस्त्यांना मान्यता ! ह्या रस्त्यांची कामे होणार…

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विविध गावच्या एकूण सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना कोरडे यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात घेऊन कामांच्या मंजुरीसाठी प्राधान्याने मागणी करण्यात आलेली होती. ही मागणी केल्यानंतर संबंधित कामांना तत्वतः मान्यताही मिळालेली होती. तत्वतः मान्यता मिळतेवेळी मंजुरीची रक्कम अवघी साडेसात कोटी इत्कीच होती

परंतु प्रत्यक्ष पाहणी करता देवीभोयरे येथील पिंपळडोह ओढ्यावर, कान्हूर पठार येथील रानमळा रस्त्यावर पूल करणे तर गांजीभोयरे येथील पांढरेवस्तीकडे जाणारा रस्ता आदी कामांवर निधी वाढविणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक नागरिकांच्या आवश्यक गरजा लक्षात घेवून, त्याप्रमाणे पुन्हा एकदा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता.

सबंधित कामांसाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव निधीच्या पूर्ततेसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून १३ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे या भागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्ताकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरवात होणार असुन,

भारतीय जनता पार्टीकडे असलेल्या सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावणारे तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपणास विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांसह विविध श्रेष्ठींची मदत होत असते.

राजकारणविरहीत सर्वसमावेशक विकासात्मक धोरण राबवत नागरीकांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याने शासनाच्या या उद्दीष्ठांपासुन पारनेर तालुका वंचित राहु नये. हाच आपला व खा. विखे पाटील यांचा सातत्याने प्रयत्न राहिला असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले.