पारनेर तालुक्याची आत्मनिर्भर श्रद्धा : स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत 60 म्हशींचा सांभाळ करत कुटुंबाला हातभार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-  निघोज येथील श्री. मुलीकादेवी हाविद्यालयातील तृतीय वर्षातील कु. श्रद्धा सत्यवान ढवण या विद्यार्थिनीने स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत 60 म्हशींचा सांभाळ करून ती कुटुंबाला हातभार लावत आहे.

केंद्रशासन, राज्यशासन, पुणे विद्यापीठ व आत्मनिर्भर भारत या योजनेने श्रद्धाच्या कामगिरीची दखल घेतली. याबद्दल महाविद्यालयात श्रद्धाच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी श्रद्धाचे अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.

आत्मनिर्भर श्रद्धाची वाटचाल ही प्रेरणादायी असून ती देशपातळीवरील व राज्यपातळीवरील मुलीसाठी दिशादर्शक आहे. निघोज येथे महाविद्यालय स्थापनेचा उद्देश गुणवंत व कीर्तीवंत विद्यार्थ्यांच्या रूपाने आज देश पातळीवर समोर आला आहे. ग्रामीण भागात जिद्दी व कष्टाळू विद्यार्थी असतात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी संस्थेने निघोज महाविद्यालयास सर्व सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यामुळे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी असणारी आवड व महाविद्यालय माध्यमातून मिळवलेला नावलौकिक जिल्हा मराठा संस्थेचा आलेख उंचावणारा आहे. श्रद्धा स्वत: आत्मनिर्भर तर बनलीच पण समाजात मुलीही आत्मनिर्भर बनतात हे यशोगाथेतून तिने दाखविले आहे. असेही झावरे यावेळी म्हणाले.

डॉ. सहदेव आहेर यांनी श्रद्धाच्या यशाचे गमक व तिची आत्मनिर्भर यशोगाथा सांगितली. तसेच निघोज महाविद्यालयाच्या माध्यमातून या तालुक्यातील उज्जल यशाद्वारे विद्यार्थ्यांच्या वैभव स्पष्ट झालेले आहे. आजही ऑनलाइन माध्यमातून शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. तसेच नॅक मूल्यांकन अहवालही महाविद्यालयाने सादर केला आहे व यासाठी महाविद्यालय सज्जही झालेले आहे असेही डॉ. सहदेव आहेर यांनी सांगितले.

यावेळी श्रद्धा ढवण यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले तर श्रद्धाचे वडील सत्यवान ढवण यांनी स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत श्रद्धा कुटुंबाला हातभार लावत आहे व ती आत्मनिर्भर बनली आहे असे सांगितले. श्रद्धाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त सिताराम खिलारी, सदस्य राहुल झावरे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी श्रद्धाचे अभिनंदन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment