Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमधील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहारातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याबाबत प्रस्ताव मंत्रालयात पाठवून अध्यादेश मिळवावा, अशी मागणी दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
महसूलमंत्री विखे पाटील हे काल गुरुवारी संगमनेर दौऱ्यावर आले असता दूधगंगा पतसंस्थेतील ठेवीदारांनी त्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी ठेवीदारांच्या वतीने महसूल मंत्र्याना निवेदन देण्यात आले.

दूधगंगा पतसंस्थेमध्ये ठेवी अडकल्याने ठेवीदारांची अवस्था बिकट झाली आहे. मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्नकार्य, कुटूंबातील आजारपण या प्रश्नामुळे ठेवीदार ग्रासले आहेत. गुन्हा दाखल होऊन महिन्याचा कालावधी उलटलेला असतानाही मुख्य आरोपींना पकडण्यात आले नाही.
आरोपी, कर्जवार, जामीनदार यांच्या मालमत्ता अॅटॅच करून जप्त करा, हा महाघोटाळा असल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रनेकडून तपास करावा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहे.