Ahmednagar News : जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नये, असे आवाहन आमदार डॉ, निलेश लंके यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ निघोज येथे आ निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या वेळी आ. लंके पुढे म्हणाले की, आपल्या हक्काचा माणूस आहे, कधीही मला आवाज द्या, मी जे बोलतो, तेच करतो. खासदारांनी तालुक्याला खासदार निधीतून काय दिले, ते त्यांनी सांगावे, त्यांनी जी कामे केली, ती सर्व जिल्हा परिषदेच्या निधीतून केली. मी माझ्या कामांचा, आमदार निधीचा लेखाजोगा मांडतो,
मी कधीही समोरासमोर चर्चेला तयार आहे. मी आमदार झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे कोरोनात गेले, एक वर्ष विरोधात गेले, आताच्या अवघ्या दीड वर्षात पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी विविध विभागांकडून १७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
निघोजमध्ये ७० कोटी रुपयांची विकासकामे केली असून, आगामी काळातही विकासकामे करत राहणार आहे. येथील पाणी, रस्ते व इतर प्रश्न जवळपास सुटले आहेत. लवकरच पारनेर येथे न्यायालयासाठी ४० कोटींची सुसज्ज इमारत उभी राहत आहे.
ढवळपुरी सारख्या दुर्गम भागात ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. माझ्या सारखा भोळा आमदार निघोजकरांना भेटल्याने येथील पाटपाण्याचा कायमचा सुटला. या वेळी आ. लंके यांनी अनेकांना कोपरखिळ्या मारत, इशारा देत, मार्मिक टिपणी केल्याने निघोजकर भारावून गेले होते.
प्रास्ताविक ठकाराम लंके यांनी केले. या वेळी निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, वसंतराव कवाद, जितेश सरडे, पारनेर बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के, पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, माजी उपसभापती खंडू भुकन, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद यांनी मनोगते व्यक्त केले.
याप्रसंगी शांताराम लंके, विठ्ठल राव कवाद, ज्ञानदेव लंके, अमृता रसाळ, संस्थेचे चेअरमन सुनिल वराळ, रोहिदास लामखडे, सुभाष बेलोटे, रमेश वरखडे, दिलीप ढवण, हभप रामचंद्र सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे संचालक, सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन लहू साबळे व सोमनाथ वरखडे यांनी केले. शांताराम कळसकर यांनी आभार मानले.