अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच एका राजकीय पक्षाने केली होती.
यातच श्रीरामपूर येथील दोन महिला चोरांना नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. या दोन महिलांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. मोराणा सुरेश भालेराव (वय- 35) व सुमित्रा सुनील सकट (वय- 45 दोघी रा. अहिल्यानगर, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वर्षा प्रशांत मिसाळ (वय- 29 रा. नालेगाव) यांची पर्स चोरीला गेली होती. यामध्ये 4 हजार रूपये रोख रक्कम, एटीएम कार्ड होते. तर कांता वारे यांचा मोबाईल, एटीएम कार्डची चोरी झाली होती. या दोन्ही घटना मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास शहरातील मोची गल्लीमध्ये घडल्या होत्या.
याप्रकरणी वर्षा मिसाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
चोरी करणार्या महिला मोची गल्लीत मिळून आल्या. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले 2 हजार रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved