Pomegranate Crop Management:- सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले आहेत आणि परंपरागत पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे फळपीके आणि भाजीपाला पिकांची लागवड करताना आपल्याला दिसून येत आहेत.
फळ पिकांच्या बाबतीत जर बघितले तर भरघोस उत्पादनासाठी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते व त्यातल्या त्यात बहार नियोजन हे खूप महत्वाचे असते. फळबागेपासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर फुलधारणा होणे खूप गरजेचे असते व जितकी फुलधारणा जास्तीत जास्त असेल तितके फळांचे उत्पादन जास्त मिळते.

अगदी हीच बाब डाळिंब पिकाच्या बाबतीत देखील लागू होते. डाळिंब बागेत यापूर्वी विश्रांती काळ आणि झाडांना ताण मिळाला असेल तर फुलधारणा चांगली होते. साधारणपणे जर झाडाचा विश्रांती काळ जर पाहिला तर फळांची काढणी केल्यानंतर दोन ते तीन महिन्याची विश्रांती देणे गरजेचे असते व त्या पाठोपाठ एक महिन्याचा ताण देणे देखील तितकेच गरजेचे असते.
या दृष्टिकोनातून डाळिंब बागेमध्ये जर चांगली फुलधारणा करायची असेल किंवा फुलधारणा व्हावी असे वाटत असेल तर काही उपाय करणे खूप गरजेचे असते.
डाळिंब बागेत चांगल्या फलधारणेसाठी करावे हे उपाय?
1- फळ तोडणी झाल्यानंतर विश्रांती कालावधीमध्ये बागेतील वाळलेल्या फांद्या तसेच झाडाचे शेंडे छाटून काढावेत.
2- त्यानंतर झाडाला अर्धी शेणखताची मात्रा, अर्धी पालाशची मात्रा व अर्धी स्फुरदची मात्रा आणि 1/3 नत्राची मात्रा शिफारसी प्रमाणे द्यावे.
3- त्यानंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी व झाडे जतन करण्याकरिता नियमितपणे पाणी द्यावे.
4- ताण देण्याच्या कालावधीमध्ये जोपर्यंत झाडाची पाने पिवळी पडून गळून जात नाहीत तोपर्यंत पाणी देणे बंद करावे.
5- ओलावा नियमितपणे ठेवण्याकरिता गरजेपुरतेच पाणी द्यावे.
6- जमीन जर भारी असेल तर ताण लवकर मिळावा याकरिता झाडाची मुळे खुरप्याच्या सहाय्याने उघडी करावी.
7- तसेच दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब पर्यंत फांद्यांची हलकी छाटणी करावी.
8- त्यानंतर ताणाच्या तीव्रतेनुसार पानगळ करण्याकरिता इथेफॉन 39% 1.2 मिली प्रति लिटर फवारावे. जेवढा जास्त ताण मिळेल तेवढी इथेफॉनची मात्र कमी लागते.
9- जेव्हा सर्व पाने गळाली असतील तेव्हा चांगल्या फलधारणेसाठी इथेफॉन 0.5 मिली प्रतिलिटर पुरेसे असते. एवढेच नाही तर इथेफॉन सोबत डीएपी पाच ग्रॅम प्रति लिटर वापरले असता चांगला रिझल्ट मिळतो.
10- पानगळ केल्यामुळे चांगल्या प्रमाणात आणि समप्रमाणात फुलधारणा होते.
वरील गोष्टी जर योग्य प्रमाणे केल्या तर 22 ते 28 दिवसात फुलधारणेस सुरुवात होते आणि 45 ते 50 दिवसात फुलधारणा पूर्ण होते.