Ahmednagar News : अकोळनेर सारख्या दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, क्लस्टरचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष सचिन सातपुते, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, समाजातील गोरगरीब व सर्वसामान्यांसह ग्रामीण भागाचा विकास करण्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन दरडोई उत्पन्न वाढून राज्याच्या व देशाच्या जीडीपी दारात वृद्धी व्हावी, यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असून उद्योग विभागाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक राज्याच्या ग्रामीण भागात उद्योग धंदे वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
भारताची अर्थव्यवस्था आजघडीला पाचव्या क्रमांकावर आहे. भारत देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याची समृद्ध जिल्हा म्हणून ओळख असून जिल्ह्याने पर कॅपिटा दर वृद्धीसाठी अधिक जोमाने काम करत जगाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपला अधिकाधिक सहभाग देण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० युवकांना रोजगार देणाऱ्या क्लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी २२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन क्लस्टर मंजूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.