२ जानेवारी २०२५ टाकळी ढोकेश्वर : पारनेर अहिल्यानगर तालुक्यातील पठार भागास पाणी मिळाल्यास अनेक वर्षांचा असलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल, यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
झावरे यांनी नुकतीच ना. विखे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. याबाबत लवकरच ना. विखे हे पारनेर तसेच मुंबईत बैठक घेणार असून, त्या माध्यमातून पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे झावरे यांनी सांगितले.
पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील पठार भागातील शेतकऱ्यांची कुकडीचे पाणी मिळावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी केवळ कागदावर राहिल्याने
पारनेर तसेच अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना आजही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
याबाबत अनेकदा सर्वेक्षण झाले; परंतु पुढील कार्यवाही काही झाली नाही. कुकडी कालवा तसेच पिंपळगाव जोगा कालवा पाणी वाटपामध्ये पारनेर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असतो.अनेक गावांतील मायनर (उपचारी) यांना गळती असल्यामुळे पाणी वाया जाते तसेच कालव्यावरून पुलाची व्यवस्था नसल्याने अनेक किलोमीटर अंतरावरून मालवाहतूक करावी लागते.
आवश्यक तेथे नवीन पुलासाठी निधीसह मंजुरी द्यावी,आदी मागण्या ना. विखे यांच्याकडे झावरे पाटील यांनी केल्या आहेत. ना. विखे पाटील यांचा जलक्षेत्रामध्ये अतिशय गाढा अभ्यास असल्याने त्याचा फायदा पारनेर तसेच अहिल्यानगर तालुक्यातील शेतक्यांना मिळेल, असा झावरे यांनी व्यक्त केला आहे.