अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नगर येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबुतीकरण करण्याची ग्वाही व्हीआरडीईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी सांगितले.
अहमदनगर येथील व्हीआरडीई संस्थेच्या स्थलांतरासंदर्भात मागील तीन दिवसांपासून सुरू झालेल्या विषयाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. विखे यांनी दिल्लीत व्हीआरडीईचे चेअरमन यांचे तांत्रिक सल्लागार संजीवकुमार, तसेच संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन नगर येथून व्हीआरडीई न हलवण्यासंदर्भात शहानिशा केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार विखे म्हणाले, नगर येथील व्हीआरडीई संस्था स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव संरक्षण विभागाचा नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु झालेल्या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील अनेक वर्षांपासून असलेली व्हीआरडीई संस्था नगर येथेच राहण्याबाबत ग्वाही देताना भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्या या संस्थेचे अधिक बळकटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
अन्य प्रकल्पही देण्याबाबतचा विचार व्हीआरडीईच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरेल, असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला. याबाबत नगर येथील व्हीआरडीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आपण स्वत: भेट घेऊन याबाबतची अधिक माहिती देणार असल्याचे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved