अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- अल्पवयीन मुलीस फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व भारतीय दंड
विधान संहिता अन्वये नेवाशातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी आरोपीस दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंड व अन्य शिक्षा सुनावल्या.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील देवा काळे यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथील मुक्तार रजाक शेख याने दहावीतील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून कारमधून पळवून नेले. मुलीला पैठण, जालना, पुणे, रायपूर, लोणार, कृष्णापुरी तांडा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
पोलीस व फिर्यादी पीडितेचे नातेवाईक यांनी आरोपीचा शोध घेतला असता सुमारे एक महिन्याने सदर अल्पवयीन मुलगी ही आरोपीच्या ताब्यामध्ये रायपूर येथे मिळून आली. त्यांना सोनई पोलीस ठाण्यात हजर केले. सदर घटनेबाबत पीडितेच्या वडिलांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीला लैंगिक ते अपराधापासून संरक्षण कायदा कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच पळवून नेल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद, अशी शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved













