अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या राहुरीच्या मुळा धरणाचा पाणीसाठा रविवारी सायंकाळी २२ हजार ५४३ दशलक्ष घनफुटापर्यंत जावून पोहाेचल्याने धरण ८७ टक्के भरले.
सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात ६ हजार २६० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. रविवारी सकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा २२ हजार २७७ दशलक्ष घनफूट झाला असताना
मुळाचे शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी २२ हजार ७७७ दशलक्ष घनफूट साठ्याची माहिती साेशाल मीडियावर दिल्याने मुळा पाटबंधारे उपविभागाचा राहुरीतील कारभार रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले.
रविवारी सायंकाळी ६ वाजता कोतूळकडून मुळा धरणात ६ हजार २६० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. कोतूळकडून येणारी पाण्याची आवक पाहता
सोमवारी दुपारपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार दशलक्ष घनफुटांपर्यंत जावून पोहचणार आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची २५ हजार ७३८ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती.
२३ ऑगस्ट २०१९ रोजी धरणातून मुळा नदीपात्रात १०८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. यंदा मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याचा योग लांबणीवर पडल्याने नदीपात्रात पाणी सोडण्याचा मुहूर्त आजपर्यंत टळला आहे.
८ ऑगस्ट या आश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात घाटमाथ्यावर सुरू झालेल्या पावसामुळे मुळा धरणात खऱ्या अर्थाने पाण्याची आवक सुरू झाली. १५ जूनला मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची ६ हजार ६१५ दशलक्ष घनफूट नोंद होती.
जून व जुलै या खात्रीच्या नक्षत्रात घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आश्लेषा नक्षत्रात झालेल्या पावसामुळे कोतूळकडून मुळा धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून अानंद व्यक्त होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved