गेल्या १९ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान सामाजिक संदेश देत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यात्रेचा तरूणांनी आदर्श घेऊन सामाजिक कामांबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.
पिंपळगांव जलाल येथून तुळजापुर, अक्कलकोट, गाणगापुरकडे निघालेली ही यात्रा नगरमध्ये पोहचल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी या यात्रेचे स्वागत केले. खा. लंके यांनी या यात्रेविषयी माहीती घेत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सलग १९ व्या वर्षी ही सायकल यात्रा गाणगापुरच्या दिशेने निघाली असून या यात्रेदरम्यान दरवर्षी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या या रॅलीमध्ये नायलॉन मांजा आणि कायदेविषयक प्रबोधन करण्यात येत आहे.५६० किलोमीटरची ही यात्रा निघाल्यापासून सहाव्या दिवशी गाणगापुर येथे पोहचणार आहे.
यंदाच्या सायकल यात्रेमध्ये तीस सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात एक पुरूष व एक महिला न्यायाधिश यांचाही समावेश आहे. ७८ आणि ६८ वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिका व इतर दोन महिलांचाही समावेश आहे.
यात्रेदरम्यान कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराबरोबरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे, ठिकठिकाणी वृक्षारोपण करून सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करणे कायद्याने गुन्हा असून त्याचा वापर टाळावा. जेणेकरून कोणत्याही मनुष्य अुवा पशु-पक्षांची हाणी होणार नाही यासंबंधी जनजागृती फलक सायकलला लाऊन प्रबोधन करण्यात येत आहे.
या यात्रेत न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, न्यायाधीश डॉ. संगीता आव्हाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे, नवनाथ भोरकडे, किशोर खोकले, रोहित पाटील, विशाल खोकले, बाळासाहेब बनकरर, गणेश मोरे, युवराज गांगवे, साईनाथ गायकवाड, प्रदीप हांडोरे, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, सुमेधा अभंग, मनिषा खोकले आदी सहभागी झाले आहे. यावेळी खा. लंके यांचे सहकारी नगरसेवक योगीराज गाडे, ॲड. राहुल झावरे, ॲड. स्नेहा झावरे उपस्थित होते.
लक्षवेधी फलक
भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे खरा, विधी सेवा प्राधिकरण जिथे, जिथे अन्यायाला वाचा फोडे तिथे तिथे, साधता संवाद संपतील वाद, न्याय सबके लिये आदी फलकही लक्ष वेधून घेत आहेत.
खा. लंके यांचा सायकल प्रवास
या सायकल यात्रेमध्ये स्वतः खासदार नीलेश लंके हे सायकलवर स्वार होत काही अंतर सहभागी झाले होते. या सायकल यात्रेचा इतरांनीही आदर्श घेऊन सामाजिक कामात सहभाग नोंदवावा. त्यातून तुमचे आरोग्य सुदृढ राहील असे खा. लंके म्हणाले.
प्रत्येकाने सायकल चालवावी
नगरमध्ये आयटीआयचे शिक्षण घेत असताना मी नगर ते भिंगार असा सायकल प्रवास करीत असे. या सायकल यात्रेच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येकाने सायकल चालविली पाहिजे कारण ते आरोग्यासाठी फायदेशिर आहे. सायकल शिकताना अनेकदा पडलो, गुडघे फुटले या आठवणीही खा. लंके यांनी या यात्रेत सहभागी युवकांशी संवाद साधताना सांगितल्या.