वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी केले ऋषी पूजन

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आपल्या देशात विविध देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजाअर्चा, यज्ञ, होमहवन, उपवास,नवस बोलण्याच्या प्रथा आहेत. याबाबत अनेक अख्यायिका देखील विविध ग्रंथामधून वाचायला मिळतात. यात विशेष म्हणजे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकणी बेडकांचे, गाढवांचे लग्न लावणे, पर्जन्ययाग देखील केला जातो.

रामायण काळापासून मानल्या गेलेल्या गांधर्व विवाहावर श्रद्धा असल्याने पावसासाठी काही भागात गाढवांचे लग्न लावतात. तसेच नगर जिल्ह्यात देखील वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पौराणिक महत्व लाभलेल्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे गोदावरी नदी काठावर पारंपरिक ऋषी पूजनसह भोजन पंगत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

संवत्सरला पौराणिक महत्व लाभले आहे. रामायण काळातील अनेक प्रसंग गोदा काठी घडल्याची अख्यायिका ग्रंथामधून वाचायला मिळते. प्रभू श्रीरामचंद्र जन्मावेळी राजा दशरथाने पूत्र कामेष्ठी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषींना अयोध्या नगरीत नेले होते. त्या शृंगऋषीचे मंदिर संवत्सर येथे गोदा काठी आहे.

याच मंदिराजवळ श्रीसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते शृंगऋषी मंदिरात महादेवाची विधीवत पूजा करण्यात आली. रमेशगिरी महाराज यांची पूजा करुन, ११ शाळकरी मुलांना भोजन देण्यात आले. यानिमित्त श्रीगणेश अभिषेक, वरुण देवता, शृंगऋषी व गुरुपूजनानंतर ऋषी भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

चांगला पाऊस पडावा, शेतात धान्य मुलबक पिकावे, यासाठी गेल्या शेकडो वर्षांपासून संवत्सर येथे हा कार्यक्रम पार पडतो. विशेष असे की, या कार्यक्रमानंतर पाऊस पडतो, असा अनुभव अनेक जुणे जाणकार सांगतात.

स्व. नामदेवराव परजणे (अण्णा) यांनी ही परंपरा स्वतःच्या हयातीत चांगल्या प्रकारे पार पाडली. रमेशगिरीजी महाराज यांनी यावेळी आशीर्वाद देताना संवत्सर परिसराचे धार्मिक महत्व विषद केले. यावेळी उप सरपंच विवेक परजणे, चंद्रकांत लोखंडे, संभाजी भोसले व लक्ष्मण परजणे यांच्या हस्ते रमेशगिरी महाराजांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe