अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अंतर्गत असलेले आयुर्वेद-अमरधाम रस्ता, आरटीओ ऑफिस येथील रस्ता तसेच शहरातील कलेक्टर कचेरीसह शहरातील विविध भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे.
हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन मनपा उपायुक्त श्री.पठारे यांना देण्यात आले.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे आदि उपस्थित होते.
उपायुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील रस्त्यासह शहरातील रस्त्यांवरुन जवळ-जवळ 3 ते 6 लाख नागरिक ये-जा करत असतात. या दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकीस्वारांचे अनेक छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत.
बर्याच महिन्यांपासून रस्त्यांची ही दुरावस्था आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार जडत आहेत. यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विविध विभागांच्या समन्वयातून या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत.
विविध शासकीय विभागात सन्मवय नसल्याने एक रस्ता तयार करतो, तर दुसरा खोदतो, अशी परिस्थिती आहे. काही कामानिमित्त रस्ते खोदलेच तर संबंधित कंत्राटदारांना तातडीने रस्ते करण्यास सांगावे. पुढील काही दिवसात रस्त्याची कामे हाती न घेतल्यास शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असे म्हटले आहे.
याप्रसंगी उपायुक्तांशी विविध विषयांवर चर्चा होऊन रस्त्यांबाबत लवकरच कार्यवाही करु, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी बाळकृष्ण चांदणे, सरपंच सचिन चांदणे, गणेश शेकटकर, विनोद चोपडा, किरण वाघ, शुभम ठोकळ आदि उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved