खरवंडी : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूती केल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला.
लॉकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली येथून वागत (जि. यवतमाळ) पायी जात असताना वडाळा बहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या.

आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका सोनाली न्यालपेल्ली- पोता व वनिता काळे- नवगिरे यांनी काळजीपूर्वक प्रसूती करुन मायलेकीला एक प्रकारे जिवदान दिले होते.
या विशेष आरोग्य सेवेबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर व माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांच्या हस्ते पुस्तक दिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला.
अन्नदान सेवा देत असलेल्या आधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मोटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य सेवक अंजाबापू चेमटे, मदतनीस लिलाबाई वैरागर, राहुल मोटे, सुमीत गिरी,
उमाकांत भोगे, साळवे, आरोग्य सहायक बाळासाहेब नवगिरे, आशा सेविका अर्चना गायकवाड, एकताचे सदस्य चंद्रकांत दरंदले, संतोष टेमक, सुधाकर होंडे, प्रविण तिरोडकर उपस्थित होते.













