Shirdi News : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना एका प्रतिष्ठित नागरिकाने फसविले !

Ahmednagarlive24 office
Published:
Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना एका प्रतिष्ठित नागरिकाने जादा पैसे घेऊन पास विकल्या प्रकरणाची तसेच डोनेशन काउंटरवर भाविकांच्या फसवणुकीबाबतची चर्चा सोशल मीडियावर तसेच नागरिकांत सुरू आहे.

त्या अनुषंगाने शिर्डी शहरातील ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

शिर्डीतील एक प्रतिष्ठित नागरीक अर्थात एका माजी पदाधिकाऱ्याने भाविकाकडून जादा पैसे घेऊन दर्शन पास विकल्याची चर्चा शिर्डीत सुरू होती. या पार्श्वभूमीवर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप,

माजी उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोंदकर, सुनील गोंदकर, नगरसेवक रवींद्र गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, नितिन कोते, सुनील गोंदकर यांच्यासह शिर्डीतील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी साईबाबा संस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

त्यानंतर शिवा शंकर यांनी ऑफलाइन पास देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. ऑनलाइन दर्शन पास सर्वांना उपलब्ध आहे. ऑफलाइन पासेस देताना भाविकांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

डोनेशन काउंटर बनावट पावतीबाबत निनावी अर्ज संस्थानला प्राप्त झाला असुन त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

भाविकांना ऑनलाइन दर्शन पासची सुविधा उपलब्ध असून संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर पास नोंदणी करून मिळवण्याची सुविधा दिलेली आहे. भाविकांनी एजंटच्या आमिषाला अथवा फसवणुकीला बळी न पडता अधिकृतपणे संस्थानच्या साइटवरून पास घेतल्यास फसवणूक होणार नाही, याची दक्षता भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe