स्वामींवर संक्रांत ! कोठडीतील मुक्काम सहा दिवस वाढला

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- दरोडा व अन्य गुन्ह्यांत अटक असलेला लॉरेन्स स्वामी याचा पोलिस कोठडीतील मुक्काम 20 जानेवारीपर्यंत वाढला आहे.

भिंगार येथील छावणी परिषदेच्या टोलनाक्यावर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी स्वामी याला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली होती. या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच त्याला आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात आली.

त्याचबरोबर त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अर्जुन पवार यांनी स्वामीच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला.

स्वामी याची मालमत्ता, विविध बँक खात्यांचे तपशील, तसेच मोबाइलबाबत तपास करण्यासाठी स्वामीला पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद पवार यांनी केला.

दरम्यान, स्वामी याच्या वकिलाने तपासात प्रगती नसल्याचे सांगत पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद यावेळी केला.

मात्र, न्यायाधीश भिलारे यांनी विशेष सरकारी वकील पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत स्वामी याच्या पोलिस कोठडीत २० जानेवारीपर्यंत वाढ केली.