अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : गावात येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाइन करताना सरपंचांना जर काही त्रास झाला, त्यांच्यावर हल्ला झाला, तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा.
तसेच सरपंचाला पोलिस बंदोबस्त द्या, अन्यथा करोनाच्या कामावर सर्व सरपंच बहिष्कार टाकतील, असा इशारा सरपंचांनी दिला आहे.
यासंदर्भात सरपंच परिषद मुंबई यांनी नगरच्या जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. नगर तालुक्यातील अनेक गावात परराज्यातून व परजिल्हातून आलेल्या व्यक्तीचे संस्थात्मक क्वारंटाइन केले नाही, तर थेट तेथील सरपंचावरच फौजदारी स्वरूपाची कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तहसीलदार यांनी तसे आदेशही काढले.
त्यामुळे सरपंच आक्रमक झाले असून त्यांनी थेट करोना निर्मूलन अनुषंगाने काम करण्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झालाय. अनेक गावात दोन परस्परविरोधी गट असतात.
या लोकांचा सर्वात जास्त त्रास सरपंचांना होतो. काही लोक मुद्दामहून रोज गावांमध्ये एकत्र चौकामध्ये, मंदिरासमोर , मोक्याच्या ठिकाणी घोळके करून थांबत गप्पा मारतात. जेणेकरून सरपंचांचा अपमान करता येईल.
करोनासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रादुर्भाव योजनांचा कसा बोजवारा उडेल, याचा ते विचार करतात. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत . त्यामुळे सरपंच कसा त्रास देतो, हे पटवून देण्यासाठी बाहेरील लोकांना फुस लावण्याचे काम काही विरोधक गावात करीत आहेत.
जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्याचे सरपंच विरोधात भांडवल करता येईल. तरी या सर्व गोष्टींची पर्वा न करता सरपंच रात्रदिवस करोना योद्धा म्हणून जीवाची बाजी लावत आहे.
अनेक गावांमध्ये महिला सरपंच आहेत. काही आरक्षणामुळे सरपंच आहेत, त्याचा फायदा सुद्धा गावातील विरोधक मंडळी घेतात. त्यामुळे त्या सरपंचांना काम करणे अवघड जाते, या सर्व गोष्टींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
सरपंचा इतकेच सर्व स्थानिक शासकीय कर्मचारी सुद्धा तेवढेच जबाबदार धरावेत, असे सरपंच परिषदेने स्पष्ट केले आहे. या निवेदनावर सरपंच परिषदेचे पदाधिकारी व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्या सह्या आहेत
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews