Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ जेऊर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती यामध्ये महत्वाची होती व त्यांच्यासोबतच या सभेचे अध्यक्षस्थानी गोविंद मोकाटे हे होते.
जेऊर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये खासदार निलेश लंके यांनी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना निलेश लंके यांनी म्हटले की,पूर्वीचे जे काही निष्क्रिय आमदार होते त्यांच्या कार्यकाळातील विकासाचा जो काही बॅकलॉग होता तो भरून काढण्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कुठल्याही पद्धतीची कसूर ठेवलेली नाही.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील जे काहीही उर्वरित आणि प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याकरिता तनपुरे यांना परत विधानभवनात पाठवा. तसेच ते येणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री राहतील, अशा प्रकारचा दावा देखील खासदार निलेश लंके यांनी या सभेत बोलताना केला.
काय म्हणाले खासदार निलेश लंके?
त्यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी म्हटले की, जेव्हा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदारकी मिळवली तेव्हा त्यांनी राज्यमंत्री म्हणून राज्यात उत्तम असे काम करून ठसा उमटवला.कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजन मॅन म्हणून मंत्रिमंडळातील लाडके म्हणून त्यांचे काम लक्षवेधी ठरले होते.
अगोदरच्या निष्क्रिय माजी आमदाराच्या कार्यकाळात थांबलेल्या विकास कामांना त्यांनी गती देण्याचे काम केले व इतकेच नाही तर विरोधी माजी आमदार दहशत व गुंडगिरी करण्यात पटाईत आहेत.
नगर परिसरामध्ये त्यांच्या दहशतीच्या किमया खूप प्रसिद्ध आहेत. जर अशा दहशत निर्माण करणाऱ्यांना या निवडणुकीत संधी मिळाली तर ते मतदार संघाचा युपी बिहार केल्याशिवाय राहणार नाहीत असे देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.
प्राजक्त तनपुरे यांनी काय म्हटले?
तसेच या सभेवेळी बोलताना आमदार तनपुरे यांनी म्हटले की, राज्य मंत्रिपदाचा कमी कालावधी मिळाला व येणाऱ्या कालावधीत मात्र महाविकास आघाडी सरकारची सत्ता परत येणार असून त्यावेळी मात्र जेऊर व परिसरातील एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही असा देखील विश्वास त्यांनी या निमित्ताने दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतानाच या परिसरातील गुंडगिरी व दहशत कायमचे संपुष्टात आणण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.