MLA Nilesh Lanke : अधिवेशन सुरु, पण सत्तेत असणाऱ्या आ. निलेश लंके यांचेच पायऱ्यांवर आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

MLA Nilesh Lanke : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. विरोधक हे आंदोलन करत असतातच, परंतु आज चित्र वेगळे दिसले. सत्तेत असणारे आ. निलेश लंके हेच आंदोलन करताना दिसले. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलंय.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशननाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके व आमदार राजू नवघरे यांनी गुरुवारी उपोषण सुरु केले.

कुणबी या शब्दाचा अर्थ जो शेती करतो किंवा जो शेतकरी आहे त्यामुळे त्याला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आमदार निलेश लंके, आमदार राजू नवघरे यांनी केली. अनेक कुटुंबांना शेती शिवाय पर्याय नसून प्रत्येक गावात ४०० ते ५०० बेरोजगार मराठा तरुण फिरत आहेत. त्यामुळे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचेही लंके व नवघरे म्हणाले.

राजकीय आरक्षण नाही भेटले तरी चालेल परंतु मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असेही ते म्हणाले.

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे व या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावे या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी निलेश लंके यांच्यासह इतर मराठा आमदारांनी थेट मंत्रालयाला टाळे ठोकले होते.

भुजबळांवर बोलणे टाळले

आंदोलन सुरु असताना सत्ताधारी मंत्री भुजबळ यांच्या वक्तव्यांवर मात्र या दोघांनी बोलणे टाळले. परंतु त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी मात्र लावून धरली होती. त्यामुळे आता या आंदोलनाचे काय पडसात उमटतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच या अधिवेशनात काय निर्णय होईल याकडेही लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe