अनेक भाविकांच्या तक्रारीनंतर साईबाबा आणि साईसंस्थानची समाज माध्यमांद्वारे बदनामी करणारांच्या विरोधात साईसंस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
भाविकांनी अशा बदनामीकारक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईसंस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी केले आहे. संस्थानच्या तक्रारीनंतर सायबर सेल सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहे.
संस्थानचे सीईओ यांनी राज्याच्या सायबर सेलचे प्रमुख व पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. दोन्हीही विभागांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. संस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याशिवाय त्यांनी उन्हाळी सुट्टीतील भाविकांची संख्या व देणगीबाबतही माहिती दिली. शिवा शंकर म्हणाले, २५ एप्रिल ते १५ जून या ५२ दिवसांच्या काळात जवळपास सव्वीस लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली या काळात भाविकांनी तब्बल ४७ कोटी ७८ लाख रुपयांचे दान साईचरणी अर्पण केले आहे. या काळात संस्थानच्या प्रसादालयात जवळपास बावीस लाखांहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.
दोन हजारांच्या बारा हजार नोटांचे दान
भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर २० मे ते १५ जून या कालावधीत भाविकांनी दानात दोन हजारांच्या जवळपास बारा हजार नोटा जमा केल्या.
याचे मूल्य २ कोटी ४० लाख रुपये असल्याचे सीईओंनी सांगितले.
राष्ट्रपती ७ जुलैला शिर्डीत
देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ७ जुलै २०२३ रोजी साईदर्शनासाठी येणार असल्याने साईमंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने
तयारी सुरु केली असल्याचेही सीईओ पी. शिवा शंकर यांनी सांगितले