अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नांदगावमध्ये मतदान केंद्र बळकावल्याची उमेदवारानेच थेट तक्रार केली असून, फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे.
नांदगाव मध्ये नागरिकांना स्वत:चे मतदान करण्यापासून रोखले जात असून विरोधी पार्टीच्या लोकांनी दबावतंत्राखाली मतदान प्रक्रिया चालू असून सदर व्यवस्था बंद करून फेर मतदान घ्यावे असा तक्रारी अर्ज प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार सलमा नसीर सय्यद यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिला होता.
याबाबत सविस्तर असे की, नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना उमेदवार सलमा नसीर सय्यद, दादा महादेव गायकवाड, सीमा भाऊसाहेब गायकवाड हे उमेदवार असून,त्यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून सलीम कासम सय्यद, बाबुराव अण्णा गायकवाड, महादेव झामा गायकवाड हे काम पाहत होते.
मतदान करताना विरोधी बाजूचे मतदान प्रतिनिधी लोकांवर दबाव तंत्राचा वापर करून त्याचे मतदान स्वत: च करत होते. कोणत्याही व्यक्तीला स्वत: चे मतदान स्वत:ला करून देत नव्हते ही बाब तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ करून हा प्रकार चालूच राहून दिला.
आम्ही त्यांना मतदान बंद करा अशी विनंती केली पण आमच्याकडे लक्ष दिले नाही, असे तक्रार अर्जात म्हटले आहे. यावर सदर तक्रारदार गटाने दुपारी २ वाजता मतदान प्रक्रियेतून भाग घेण्यास बंद केले व दुपारी ३ वाजता कर्जत मध्ये येऊन तहसीलदार यांना तक्रारी अर्ज दाखल केला.
दरम्यान नांदगाव येथील उमेदवार यांनी तक्रार अर्ज दिला आहे, मात्र त्या तक्रारींमध्ये तथ्य नाही अशी प्रतिक्रिया तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved