Ahmednagar News : शिंदे, फडणवीस, पवार सरकारने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध केली आहे. एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत २३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ४६ हजार ३४० शेतकरी सहभागी झाले आहेत. ३१ जुलैपर्यंत या योजनेची मुदत असून जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो. आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समायीक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता.

मात्र २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देऊ केला आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ९६ कर्जदार आणि चार लाख ९१ हजार २४४ बिगर कर्जदार अशा एकूण पाच लाख ४६ हजार ३४० शेतकऱ्यांनी दोन लाख ८८ हजार ५३८ हेक्टर खरीप पिकाचा विमा उतरवला आहे.
मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार २२६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण २२६% आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा जागर करण्यात आला.
जिल्ह्यातील चार उपविभागीय कृषी अधिकारी, १४ तालुकास्तरीय कृषी अधिकारी आणि जवळपास ५०० कृषी सहाय्यक यांनी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवली. त्यातूनच यावर्षी खरीप हंगामात या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उच्चांकी सहभाग झाला आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र पाच लाख ८० हजार हेक्टर आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यात चार लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यात सोयाबीन एक लाख १४ हजार हेक्टर, कापूस सव्वा लाख हेक्टर, बाजरी ४५ हजार, मका ४२ हजार, तूर ४० हजार ५००, १४ हजार ७००, उडीद ३२ हजार ८१४ हेक्टरचा समावेश आहे.