अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Politics :- महापालिकांच्या सर्वसाधरण सभेत सभेचे अध्यक्ष असलेल्या महापौरांसमोर राजदंड, बाजूला खास पोषाख परिधान केलेला चोपदार उभा.
असं दृष्य सर्व महापालिकांच्या सभेत पहायला मिळतं. अहमदनगरमध्ये मात्र, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ना राजदंड दिसला ना चोपदार. त्याचं कारणही तसंच आहे. यासंबंधी नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.
तेव्हा त्यांना प्रशासनातर्फे उत्तर देण्यात आलं की, चोपदाराची भूमिका करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नुकतंच निधन झालं आहे. त्याच्या जागी पोषाख परीधान करून ही भूमिका करण्यास दुसरे कर्मचारी तयार नाहीत.
त्यामुळं राजदंड आणि चोपदार नाहीत, असं प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये असा राजदंड ठेवण्याची प्रथा आहे. विरोधकांकडून गोंधळ घालून राजदंड पळवून नेण्याचे प्रकारही घडतात.
राजदंडाविना कामकाज जणू निरर्थक, एवढं या राजदंडाला महत्व देण्यात आलं आहे. असं असलं तरी अलीकडं हा वादचा विषय ठरला आहे. २०१७ मध्ये सोलापूरमधून या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
हा राजदंड आणि चोपदार कोणत्या नियमानुसार सभेत आणले जातात, याची विचारणा यातून करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्येही चोपदार, राजदंड आणि महापौरांचा गाऊन तसंच बैठक व्यवस्था याला विरोध करणारी याचिका यापूर्वीच दाखल झालेली आहे.
अहमदनगरमध्येही राजदंड आणि चोपदाराची प्रथा सुरू होती. ती आता वेगळ्याच कारणामुळं मागं पडत आहे. चोपदाराच्या रिक्तपदावर भरती झाली नाही, तर ती मागं पडण्याचीच शक्यता अधिक आहे.