अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :बडतर्फ सैनिक प्रशांत भाऊराव पाटील (वय- ३२) याने नगर जिल्ह्यातील आठ ते दहा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे २० लाख रुपयांना फसविल्याची बाब समोर आली आहे.
मिलिट्री इंटेलिजन्स आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक पाटील याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही कारवाई होताच फसवणूक झालेल्या तरुणांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली.
पोलिसांनी या तरुणांचे जबाब नोंदविले आहेत. पाटील याने प्रत्येकाकडून दोन ते अडीच लाख रुपये घेतले असल्याचे या तरुणांनी पोलिसांना सांगितले. फसवणूक झालेले अनेक तरुण अजून पोलिसांपर्यंत आले नाहीत.
यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटील याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्याला दि. २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाटील हा आसाम रायफल रेजीमेंट येथे नोकरी करीत असताना सन २०१४ मध्ये रजेवर आल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर हजर झालाच नाही. त्यामुळे त्यास नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले होते.
त्यानंतरही तो सैन्यदलाचे अधिकारी रँकचे युनिफॉर्म वापरून आणि बनावट ओळखपत्राद्वारे लोकांना सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत शासनाची तसेच लोकांची फसवणूक करीत होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना याबाबत माहिती मिळताच पाटील याला अटक करण्यात आली. भारतीय सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र आणि चिन्ह तो वापरत होता.
स्वतःच्या बलेनो वाहनावर ‘ऑन ड्युटी आर्मी’ असा मजकूर लिहून तो फिरत असे. त्याने अनेकांना गंडा घातला आहे. नगर शहर, नगर ग्रामीण, पाथर्डी, आष्टी (जि. बीड) आदी ठिकाणच्या आठ ते दहा तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews