Ahmednagar News : सध्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रोडरोमीओचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. शहर परीसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे.
मात्र श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामस्थांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा पाठलाग करणाऱ्या रोडरोमीओची संतप्त जमावाने दुचाकी जाळून टाकत चांगलीच अद्दल घडवली आहे. या घटनेत एकास नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दुसरा मात्र पसार झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाची सुटी झाल्यानंतर एसटीने घरी परतत असताना दोन रोडरोमीओ एसटीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने त्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांशी संपर्क करून हा प्रकार सांगितला.
पालकांनी लागलीच धाव घेत त्या एसटी पर्यंत पोहचले तर ते दोन रोडरोमीओ एसटीचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पालकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले. परंतु एकाने पालकांना हुल देत पलायन केले. व एक जण पालकांच्या हाती लागला.
या पालकांनी त्या रोडरोमीओस मोटारसायकलसह टाकळीभान येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेले. परंतु तेथे पोलीस उपलब्ध नसल्याने, रोडरोमीओ पकडल्याचे समजताच तेथे मोठा जमाव जमा झाला. संतप्त जमाकडून होणारी मारहाण टाळण्यासाठी काहींनी एकास गाळ्यात बंद करून ठेवले.
मात्र दरम्यानच्या काळात टाकळीभान येथील संतप्त जमावाने त्या रोडरोमीओच्या दुचाकीची मोडतोड करत राज्यमार्गावर जाळली.यावेळी रोडरोमी ओस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मात्र या भागातील महाविद्यालयाच्या आसपास भटकणाऱ्या रोडरोमीओंची मात्र पाळता भुई थोडी झाली आहे.
टवाळखोरांमध्ये महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या युवकांचा समावेश आहे हे विशेष. शिक्षण नसताना बिनधास्तपणे हि मुले सर्वत्र वावरतात. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्राची सक्ती करण्याची गरज असताना महाविद्यालय प्रशासन मात्र या बाबीकडे कानाडोळा करतात.
आवडत असणाऱ्या मुलींचा पाठलाग करुन त्यांची नावाची माहिती मिळवण्यापासून ही मुले सुरवात करतात. त्यानंतर सोशल मिडीयावर संबंधित मुलीला संंपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होतो.