Ahmednagar News : पशुसंवर्धन क्षेत्र हे प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. पशुधनाची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.त्यानुसार यावर्षी आज १ सप्टेंबरपासून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना २१ वी आहे.
प्रथमच डिजीटल पध्दतीने मोबाईल अँपच्या मदतीने होणारी ही पशुगणना पुढील चार महिने चालणार आहे. या पशूगणनेत जिल्ह्यातील गायी, म्हशी, कुत्री (पाळीव आणि भटके स्वतंत्रपणे), शेळ्या, मेंढ्या, गाढवे, उंट, घोडे आणि डुकरांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. देशातील लोकसंख्या ज्या पद्धतीने मोजली जाते, त्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यावर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही पशुगणना होणार आहे.
पशुगणनेसाठी यंदा पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर केला जाणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते, तर त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीत अनेक रकाने होते.
ते भरताना बराच वेळ जात असे. मात्र, यावर्षी होणाऱ्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी एका विशिष्ट अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे.
यंदाची पशुगणना ही जनावरांच्या जाती आणि प्रजातीनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी ५८३ प्रगणक आणि ७८ पशुपर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने दुधाला अनुदान देण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील पूशधनात वाढ झाल्याचे पहावसाय मिळाले आहे. यामुळे यंदाच्या पशूजनगणेत जिल्ह्यात दुभात्या जनावरांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.