अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- कोरोना काळात शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुल करणार्या वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर पालकांच्या तक्रारीवरुन शिक्षणाधिकारी यांनी त्रिस्तरीय समिती नेमली असून,
या समितीने पालकांकडून करण्यात येत असलेल्या अवाजवी फी वसुली संदर्भात त्वरीत आपला अहवाल सादर करुन शालेय प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आले. यावेळी पालक अंतू वारुळे, रामदास ससे, अंकुश गिते, रोमेश बेलेकर,

झेबा मुजावर, दीपक चांदणे, नितीन शिंदे, वैभव भोराडे आदी पालक उपस्थित होते. राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू एका कार्यक्रमा निमित्त शहरात आले असता त्यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर प्रश्न मार्गी लावून पालकांना दिलासा
देण्याचे सुचना केल्या. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच शाळा बंद असून, सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. मात्र शाळेकडून इतर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी केली जात असल्याबाबत पालकांनी आक्षेप घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाबरोबर पालकांचा शालेय वाढीव फी संबधी संघर्ष सुरू आहे. सर्व फी नाही भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करु असा इशारा शालेय प्रशासनाने पालकांना दिला होता.
याप्रकरणी शाळेतील पालकांच्या तक्रारीवरून त्रिस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळात आर्थिक स्थिती बिकट असल्याने इतर अवाजवी फी भरु शकत नसल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













