Ahmednagar News : कृष्णा खोरे व गोदावरी खोऱ्यातील पावसाळ्यात अतिरिक्त वाया जाणारे पाणी पाथर्डी सारख्या दुष्काळी भागाला मिळावे, यासाठी तांत्रिक बाजू तपासण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात येईल.
जलसंधारण तज्ज्ञांच्या सहकार्याने पाथर्डी तालुक्यातील शेतीला हे पाणी आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जलक्रांती परिषद काम सुरू करीत असल्याची माहिती प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी दिली.
या वेळी संभाजी पालवे, आदिनाथ महाराज आंधळे, भगवानराव आव्हाड उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलाताना खेडकर म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील जनता किती दिवस पाण्याबाबतचा अन्याय सहन करणार?
गोदावरी व कृष्णा खोरे यांच्यातील पावसाळ्यात अतिरिक्त ठरणारे पाणी पाटाच्या व लिप्टच्या सहाय्याने तालुक्यातील सर्व भागात आणण्यासाठी जलक्रांती परिषद आग्रही आहे.
यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण खासगी कंपनीकडुन करुन घेण्यात येईल. त्यानंतर तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. सरकारकडे मागणी करू. त्यानंतर न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन यासाठीचा लढा उभारीत आहोत.
यामध्ये कोणतेही राजकारण नाही, पक्ष नाही, सर्वपक्षीय नेते व कार्यकत्यांचा समावेश असलेली कृती समिती तयार करू. जलतज्ज्ञ, पाटपाणी तज्ज्ञ व जाणकारांची मते जाणून घेऊ, त्यानंतर शासनाकडे रितसर मागणी करू. हे काम अतिशय अवघड असले तरी ते अशक्य नाही. यासाठी संर्ष करावा लागेल.
त्यासाठी आमची तयारी आहे. न्यायालयातही जाऊ आणि तेथुन आदेश मिळवू, लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊ. उत्खातोड कामगारांच्या हातातील कोयता खाली ठेवण्याचे काम करावयाचे आहे. शेतीला पाणी मिळाल्यास येथील स्थलांतर थांबेल, रोजगार मिळेल, शेतीचे उत्पन्न वाढेल. दोन महिन्यांत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.
त्यानंतर तांत्रीक माहिती जमा करू. आपल्या जवळून पंचवीस किलोमीटर अंतरावरुन लातुरला बोगद्यातून पाणी जाणार आहे. तेथुन आऊटलेट काढुन पाणी वळवता येईल का, याची तांत्रीक बाजू समजवून घेऊ.
कोकणातील पाणी घाटमाथ्यावर वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामधून आपल्याला पाणी मिळावे, यासाठी काम कारवे लागले. पाटपाण्याने तलाव, बंधारे, नद्या यामध्ये पाणी सोडले तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे खेडकर म्हणाले. भगवान आव्हाड यांनी आभार मानले.
शेतीला पणी मिळावे यासाठीचा लढा उभारताना शेतकऱ्यांनी मदतीवी भाना ठेवावी. ज्यांच्या जमीनी जातील त्यांनी पुढे यावे. सहकार्य करावे. विरोध करु नये. पाणी आल्यानंतर उत्पन्न वाढुन आणखी जमीनी घेता येतील.
मात्र १० व २० गुंठे जमीनी पाटपाण्यास गेल्यास त्याची काळजी करु नये. हे काम सर्वांना सोबत घेवुन करणार अहोत. प्रत्येक गावातील युवकांनी या कामात पुढाकार घ्यावा व सर्वेक्षणाला आलेल्या कर्मचऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन दिलीपराव खेडकर यांनी केले आहे.