Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. ९) औटेवाडी, श्रीगोंदा येथे जाहीर सभा होणार असून,
या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा समाजामध्ये जनजागृती करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी राज्यात आजवर अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत.
राज्य सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर नगर जिल्ह्यात जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा होत आहे. ही सभा श्रीगोंदा शहरानजीक जामखेड- श्रीगोंदा रस्त्यावरील वरील औटेवाडी येथे होत आहे.
सभेचे नियोजन अंतिम टप्यात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जरांगे पाटील काम करत आहेत. श्रीगोंदा येथे होणाऱ्या सभेसाठी साठ एकर जागा निश्चित करण्यात आली असून,
जेसीबीच्या सहाय्याने साफ सफाई करण्यात आली आहे. मराठा समाजाचे शेकडो तरुण गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र काम करत आहेत.
या सभेसाठी एक लाखाहून अधिक मराठा बांधव येतील, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या भारती इंगावले यांनी दिली.