अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (५१६ अ) चौपदरीकरण कामाची ई-निविदा नुकतीच जाहीर झाली.
त्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी या महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ किलोमीटर कामासाठी ५४७.१६ कोटी, तर घोगरगाव ते नगर-सोलापूर हद्द या ४१.६१५ किलोमीटर कामासाठी ६४१.४५ कोटींचा निधी दोन पॅकेजमध्ये राज्य शासनाच्या भारतमाला परियोजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.
अनेक अडचणींमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याबाबतची सर्व कार्यवाही थांबली होती. महामार्गासाठी भूसंपादनाचा प्रश्न, तसेच काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका व इतर अडचणींमुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. आमदार पवार यांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सर्व अडचणी समजावून घेतल्या.
त्यांनी लगेच नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह उपवनसंरक्षक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, श्रीगोंदे व नगरचे उपविभागीय अधिकारी, सहायक संचालक नगर रचना विभाग,
नगररचनाकार, वीज अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे आदी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या-त्या विभागास आपापली जबाबदारी देऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
एका महिन्यानंतर आमदार पवार यांनी दुसरी बैठक त्याच ठिकाणी घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी आमदार पवारांचा पॅटर्न राबवल्याने अडथळे दूर झाले.
भूसंपादनाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली. त्यानंतर महामार्गाच्या या कामाचा प्रस्ताव सर्व अटी, शर्ती पूर्ण करून दिल्लीला पाठवण्यात आला.
एवढ्यावर आमदार पवार थांबले नाहीत. त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन मंजुरीसाठी विनंती केली होती.अखेर त्यांना या कामात यश मिळाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved