नुकत्याच झालेल्या अधिवेशनात श्रमिक मजदूर संघाच्या मानधन वाढीच्या मागणीला अखेर यश आले आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढीचा निर्णय ५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कमी पगारावर काम करणारे कर्मचारी म्हणजे शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी होय. ही योजना २००३ सालापासून सुरु झाली आहे. सुरूवातीला फक्त ३०० रुपये दरमहा इतके मानधन दिले जात होते.
त्यानंतर ते मानधन वाढून ५०० रुपये केले. त्यानंतर १ हजार रूपये, नंतर १५०० आणि शेवटी २५०० रुपये, असे तुटपुंजे मानधन दिले जात आहे. त्यामुळे सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, निवेदन देऊन एक लोक चळवळ उभारली आहे.
संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांना शासकीय सेवेत जो पर्यंत सामावून घेत नाही तो पर्यंत १५ हजार रूपये मानधन द्या, अशी प्रमुख मागणी केली आहे. हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देऊन मानधन वाढविण्याची मागणी केली होती.
ती मागणी काही अंशी मान्य करून एक हजार रुपयाने मानधन वाढीचा निर्णय ५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आपल्या इतर मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही, तो पर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले आहे.
या लढ्यात संघटनेचे राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, कावेरी साबळे, शितल दळवी तसेच राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे तसेच सर्व जिल्हा व तालुका कार्यकारणी व सभासदांनी साथ दिली आहे.