Ahmednagar breaking : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सरपंच बाळासाहेब अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर दाखल केलेले गुन्हे व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घ्यावी,
या प्रमुख मागणीसाठी करंजीसह परिसरातील नागरिकांनी आज नगर-पाथर्डी महामार्गावर सुमारे पाऊणतास रास्ता रोको आंदोलन केले.
करंजीचे सरपंच व तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर पाथर्डी पोलिस स्टेशनला एका माध्यमिक शिक्षिकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला,
त्यावरुन कसलीही चौकशी न करता आदर्श जिल्हा परिषदेकडून शिक्षक विजय अकोलकर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज करंजीसह दगडवाडी, भोसे, खांडगाव, सातवड येथील संतप्त नागरिकांनी करंजी बसस्थानकावर सुमारे पाऊणतास रास्ता रोको आंदोलन करून या तिघांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत व आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली.
या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-पाथर्डी महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. शिवसेनेचे उपजिल्हाउपप्रमुख रफिक शेख यांनी करंजी गावात व परिसरातील गावात अशा प्रकारची घटना आजपर्यंत घडलेली नाही.
गाव आणि परिसरातील शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृतीविरोधात हा लढा असून, हे खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई त्वरित मागे न घेतल्यास परिसरातील सर्व प्राथमिक शाळांना पालक टाळे ठोकतील, असा इशारा दिला आहे.
सरपंच, उपसरपंच आदर्श शिक्षकासह इतर आणखी वीस-पंचवीस लोकांवर अशा स्वरूपाची कारवाई करण्याची शक्यता असून, असे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम काही प्रवृत्तींकडून केले जात असल्याचे सुनील साखरे म्हणाले.