अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- मालमत्ताकराच्या थकबाकीवरील दंडाच्या रकमेत महिनाभर ७५ टक्के व त्यानंतर ५० टक्के सवलत महापालिकेने दिली. त्यापोटी मनपाच्या तिजोरीत ४८ कोटींचा कर जमा झाला.
वसुलीची गती मंदावली असली, तरी डिसेंबरअखेर किमान ७० कोटीपर्यंत वसुली करण्याचा प्रयत्न मनपास्तरावर सुरू आहे. नगर शहरातील सुमारे ९१ हजार मालमत्ताधारकांनी तब्बल १९४ कोटींचा कर थकवला आहे.
त्यापैकी १०२ कोटी निव्वळ दंडाची (शास्ती) रक्कम आहे. या दंडाच्या रकमेवर १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान तब्बल ७५ टक्के सूट दिली होती. त्यामुळे मनपाने सवलत वगळता १२० कोटींच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू ठेवले.
याव्यतिरिक्त चालू वर्षातील (२०२०-२१) ४६ कोटी वसूल करायचे आहेत. जो मालमत्ताधारक मागील थकबाकीसह चालू वर्षातील एकूण थकबाकीचा भरणा करेल, त्याच थकबाकीदाराला ५० टक्के शास्तीमाफीची सवलत दिली जाणार आहे.
एकवेळ तोडगा काढून मालमत्ता करवसुली सुरळीत करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. तथापि, नागरिकांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या टप्प्यात १ ते ३० नोव्हेंबरमध्ये ७५ टक्के दंडावर सवलतीचा निर्णय घेतला होता, त्याला १५ डीसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
त्यानंतर १६ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत दंडावर ५० टक्केच सवलत दिली. तथापि, वसुलीचा वेग पुन्हा एकदा मंदावला आहे. दोन आठवड्यांपूर्वी दररोज २० ते २५ लाखांचा दैनंदिन भरणा झाला, पण सद्यस्थितीत दररोज ४ ते ५ लाखच वसूल होत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved