पाथर्डी : राज्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांवर उद्याची गुणवंत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याने शिक्षकांनाकडे अशैक्षणिक कामे नकोच, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. यासाठी मुख्यमंर्त्यांना देखील भेटून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे तंत्रशिक्षण व नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी कल्याण लवांडे तसेच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सरचिटणीसपदी शामराव लवांडे यांची निवड झाल्याबद्दल या दोन्ही लवांडे बंधूंच्या नागरी सत्कार समारंभाच्या प्रसंगी नामदार तनपुरे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून आ.मोनिकाताई राजळे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बसवदे, राज्य उपाध्यक्ष हरिदास घोगरे, माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे, माजी सभापती संभाजीराव पालवे, माजी जि.प.सदस्य मोहनराव पालवे, माजी पं स.सदस्य गोविंदराव मोकाटे, युवानेते अमोलराव वाघ, भाऊसाहेब लवांडे, राजू शेख,ॲड.वैभव आंधळे, रफिक शेख सर, उपसरपंच इलियास शेख, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ना.तनपुरे म्हणाले मी राहुरीचा नगराध्यक्ष असताना नगरपालिकेच्या सर्व शाळांना ऊर्जितावस्थेत आणून त्या सर्व डिजिटल शाळा करून शैक्षणिक क्षेत्राला प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे यापुढील काळातही उद्याची पिढी सुसंस्कृत व विद्वान घडवण्यासाठी शिक्षणाला व गुणवत्तेला मोठे महत्त्व राहणार असून, त्यादृष्टीने शिक्षकांकडे असणारे अवांतरकामे कमी करण्यासाठी व त्यांना पूर्णवेळ शैक्षणिक कामासाठी मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही नामदार तनपुरे यांनी देत अनिल कराळे तालूक्यातील हजारजबाबी आणि संघर्षशिल व्यक्तीमत्व असल्याचे म्हणत कराळे यांच्या कामाचे कौतुक केले.